महाराष्ट्रात सहकारी ॲग्रीगेटर टॅक्सी सेवेला हिरवा कंदील; लाखो चालकांना आर्थिक स्थैर्याचा मार्गमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; परिवहन विभागाला तातडीने नियमावली तयार करण्याचे निर्देश
📰 पीसी वार्ता | मुंबई
मुंबई, दि. ३ जून : महाराष्ट्रात ऑनलाइन ॲप आधारित ॲग्रीगेटर सहकारी टॅक्सी सेवेबाबत परिवहन विभागामार्फत तातडीने नियमावली तयार करून या सेवेला परवानगी देण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सहकारी ॲग्रीगेटर टॅक्सी सेवेमुळे लाखो चालकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षा निर्माण होण्यास मदत होईल. चालकांना केवळ कामगार न ठेवता मालक बनविण्याच्या उद्देशाने ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, रणधीर सावरकर, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, राज्य परिवहन महामंडळ देखील ‘छावा’ या नावाने स्वतंत्र ॲप विकसित करत आहे. सध्या ॲग्रीगेटर टॅक्सी सेवांमध्ये चालकांना सामाजिक सुरक्षेचा अभाव, आर्थिक अस्थिरता आणि विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सहकाराच्या माध्यमातून चालकांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यावेळी भारत टॅक्सीचे कर्नल हिमांशू यांनी सादरीकरणाद्वारे माहिती देताना सांगितले की, मुंबईत भारत टॅक्सी सेवेची सुरुवात करण्यात येणार असून त्यानंतर पुणे व नागपूरमध्येही सेवा विस्तारली जाईल