अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याविरोधात 32 आरोपी अटकेत
12 लाख 16 हजार 965 रुपयांचा मुद्देमाल जप्त, 26 आस्थापना सील
मुंबई, दि. 1 जून : राज्यात प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून 30 आणि 31 मे 2026 या दोन दिवसांत मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत 32 आरोपींना अटक करण्यात आली असून 26 आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. तसेच 12 लाख 16 हजार 965 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागात एकाचवेळी कारवाई करण्यात आली.
कोकण विभागात 16 आस्थापनांवर कारवाई करून 16 जणांना अटक करण्यात आली. बृहन्मुंबईत एका ठिकाणी कारवाई करून दोन जणांना अटक करण्यात आली. पुणे विभागात तीन ठिकाणी छापे टाकून दोन आरोपींना अटक करण्यात आली. नाशिकमध्ये दोन कारवायांमध्ये दोन जणांना अटक झाली, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 कारवायांमधून सात जणांना अटक करण्यात आली. अमरावती विभागात तीन कारवायांमध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली.
प्रतिबंधित गुटखा व पानमसाला विक्रेते तसेच नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अन्नपदार्थांमध्ये भेसळ किंवा दर्जाबाबत शंका असल्यास नागरिकांनी त्वरित अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
– पीसी वार्ता | मुंबई ब्युरो
#पीसीवार्ता #PCVarta #GutkhaBan #FoodAndDrugsAdministration #TukaramMundhe #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiNews #PuneNews #CrimeNews #LatestNews #Maharashtra
