विषारी दारू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी व दोषींवर मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी : रविंद्र ओव्हाळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात ओव्हाळ यांनी नमूद केले आहे की, विषारी दारू प्रकरणात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून काही जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या घटनेमागील संपूर्ण साखळी उघड करून दोषींना कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे.
तसेच, या प्रकरणात केवळ दारू विक्रेतेच नव्हे तर संबंधित विभागातील हलगर्जीपणा करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचीदेखील चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याबरोबरच पिंपरी-चिंचवड, पुणे शहर व ग्रामीण भागातील हातभट्टी दारू आणि अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्याची गरज असल्याचेही ओव्हाळ यांनी नमूद केले आहे.
बेकायदेशीर दारू आणि अमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्यामुळे अनेक युवक व्यसनाधीन होत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे अशा अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
"विषारी दारू प्रकरणातील एकाही दोषीला पाठीशी घातले जाऊ नये. मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घ्यावी," असे आवाहन रविंद्र ओव्हाळ यांनी केले.
– PC वार्ता | पिंपरी-चिंचवड ब्युरो