पिंपरी-चिंचवडला राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणखी एका आमदारकीची मागणी
पिंपरी, दि. 26 मे 2026 : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी तसेच भविष्यात शहराला आणखी एक आमदारकी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार सेल पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष रशीद हमीद सय्यद यांनी पक्षाचे नेते व खासदार पार्थ पवार यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पिंपरी-चिंचवड हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक, सामाजिक आणि राजकीय केंद्र असून येथे मोठ्या प्रमाणात कामगार, मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिक वास्तव्यास आहेत. शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मजबूत जनाधार असून कार्यकर्ते सातत्याने पक्षवाढीसाठी मेहनत घेत आहेत.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत विविध पक्षांकडून शहरात संघटनात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील शहरात अधिक संघटनात्मक बळकटी निर्माण करून आगामी निवडणुकांसाठी तयारी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
तसेच शहरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेता भविष्यात पिंपरी-चिंचवड शहराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणखी एक आमदारकी देण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे पक्षसंघटना अधिक मजबूत होईल, नव्या नेतृत्वाला संधी मिळेल आणि शहरातील विविध विकासकामे तसेच नागरिकांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे विधानसभेत मांडता येतील, असा विश्वास निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय प्रतिनिधित्वाला अधिक बळ द्यावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
– PC Varta News Desk