"आमच्या काळात महापालिका कर्जमुक्त होती, आज पालिकेला भकास करण्याचं काम सुरू"; अजितदादांचा काळेवाडीतून सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार!
PC वार्ता राजकीय विशेष: "आमच्या काळात महापालिका कर्जमुक्त होती, आज पालिकेला भकास करण्याचं काम सुरू"; अजितदादांचा काळेवाडीतून सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार!
पिंपरी-चिंचवड (काळेवाडी): "राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात आम्ही शहराचा कायापालट केला, मोठे उड्डाणपूल आणि रस्ते बांधले, पण कधीही शहरावर कर्जाचा बोजा टाकला नाही. आमच्या कारभारावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. मात्र, आज शहरावर कर्जाचा डोंगर उभा करून पिंपरी-चिंचवडला भकास करण्याचं काम सुरू आहे," अशा सडेतोड शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापकीर नगर, काळेवाडी येथील प्रभाग क्रमांक २२ आणि २७ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित 'विजय निर्धार सभेत' ते बोलत होते.
विकासाचा 'अजित' पॅटर्न: ८० टक्के समाजकारण!
अजितदादांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासधारेचा पुनरुच्चार केला. "आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी चालणारे लोक आहोत. आम्ही कधीही जाती-पातीचं राजकारण केलं नाही आणि करणारही नाही. ही निवडणूक केवळ आजची नाही, तर आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याची आहे," असे सांगत त्यांनी विकासासाठी राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
प्रभाग २२ आणि २७ चे 'रणबहाद्दर' मैदानात:
यावेळी अजितदादांनी प्रभाग २२ आणि २७ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे जाहीर करत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले:
प्रभाग २२: श्रीम. मोनिकाताई नवनाथ नढे, श्रीम. उषाताई दिलीप काळे, श्री. मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर, श्री. संतोष अंकुश कोकणे.
प्रभाग २७: श्री. सुमित डोळस, सौ. अश्विनीताई तापकीर, सौ. अनिताताई थोपटे, श्री. सागर कोकणे.
स्थानिक समस्यांचे निवारण हाच आमचा 'अजेंडा'
पाण्याचा प्रश्न, वाहतूक कोंडी, सांडपाणी व्यवस्थापन, डीपी रस्ते, आरोग्य सुविधा आणि झोपडपट्टी पुनर्वसन यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस नियोजनबद्ध काम करेल, अशी ग्वाही दादांनी यावेळी दिली. "आमचे उमेदवार कार्यतत्पर असून ते स्थानिक प्रश्नांची तड लावण्यासाठी सक्षम आहेत," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

