PC वार्ता विशेष: पुण्याच्या विकासाचा 'मॅरेथॉन' मॅन हरपला! माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन; राजकीय व क्रीडा क्षेत्रावर शोककळा

पुणे: "पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राला जागतिक ओळख मिळवून देणारे अनुभवी ज्येष्ठ नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने हरपले आहे. त्यांच्या जाण्याने पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे," अशा शब्दांत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुण्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारा एक द्रष्टा लोकनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. हवाई दलाचा पायलट ते दिल्लीचा दबदबा भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची यशस्वी सुरुवात करणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी पुढे राजकारणात आपला मोठा ठसा उमटवला. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून काम करताना त्यांनी पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला गती दिली. केवळ राजकारणच नव्हे, तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (IOA) अध्यक्ष म्हणून त्यांनी क्रीडा क्षेत्रात दीर्घकाळ दिलेले योगदान ऐतिहासिक ठरले आहे. पुण्याला मिळवून दिली जागतिक ओळख पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा 'पुणे फेस्टिव्हल' आणि धावपटूंना व्यासपीठ मिळवून देणारी ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ हे उपक्रम सुरेश कलमाडी यांच्याच दूरदृष्टीचा परिणाम आहेत. या उपक्रमांमुळे पुण्याची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक गडद झाली. अष्टपैलू नेतृत्वाला श्रद्धांजली राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वच पक्षांतील नेत्यांनी कलमाडी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पुण्याच्या सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणीत त्यांनी दिलेले योगदान पुणेकर कधीही विसरू शकणार नाहीत. त्यांच्या जाण्याने एका 'कलमाडी युगाचा' अंत झाला आहे.