PC वार्ता ब्रेकिंग: "निधी कमी पडू देणार नाही, पण कामाचा दर्जा राखा"; मावळमध्ये अजितदादांची ग्वाही!



मावळ/लोणावळा: "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच विकासाला मानणारा पक्ष राहिला आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. मावळ-लोणावळा परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही," अशी खणखणीत ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. अजितदादा पवार यांनी दिली.


​मावळ येथे आयोजित विशेष सत्कार समारंभ आणि पक्ष प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अजितदादांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.


नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान

​या कार्यक्रमात लोणावळा नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. राजेंद्र सोनवणे, वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा श्रीम. अबोली ढोरे आणि तळेगाव दाभाडे येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचा अजितदादांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधत इतर पक्षांतील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. अजितदादांनी त्यांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


विकासाचा 'अजित' मंत्र

​उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजितदादांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. ते म्हणाले, "तुम्ही लोकांचे विश्वस्त आहात. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन आणि STP प्रकल्प यांसारख्या मूलभूत कामांमध्ये तडजोड खपवून घेतली जाणार नाही. कामाचा दर्जा उत्तमच हवा. औद्योगिक, पर्यटन आणि कृषी क्षेत्रात मावळला अग्रेसर करण्यासाठी स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करा."

आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती

​या भव्य सोहळ्याला मावळ-लोणावळा मतदारसंघाचे आमदार श्री. सुनील शेळके यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, नवनिर्वाचित नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.