राष्ट्रवादीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष आयुष निंबाळकर यांचा कमळ हाती; निगडीत झाला भव्य पक्षप्रवेश सोहळा!
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी):
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा मोहननगर परिसरातील वजनदार युवानेते आयुषभाऊ निंबाळकर यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. निगडी येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते निंबाळकर यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
आयुष निंबाळकर हे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचे खंदे समर्थक आणि खानदेश समाजाचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे बहुमोल योगदान असून, त्यांच्या या कार्याचा मोठा प्रभाव संपूर्ण परिसरात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून त्यांनी युवकांचे मोठे संघटन उभे केले होते, जे आता भाजपच्या पाठीशी उभे राहिले आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्याला भोसरीचे आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांसह भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. निंबाळकर यांच्यासोबत मोहननगर, काळभोरनगर आणि आकुर्डी परिसरातील सुमारे १०० हून अधिक सक्रिय कार्यकर्त्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला.
शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची भक्कम शिदोरी:
आयुष निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या डी.बी. निंबाळकर इंग्लिश स्कूल तसेच निंबाळकर प्राथमिक व माध्यमिक मराठी प्रशालेच्या माध्यमातून त्यांचा सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि पालकांशी दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या या प्रदीर्घ सामाजिक सेवेचा आणि जनधाराचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी निश्चितच होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
या पक्षप्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड शहरात विशेषतः पिंपरी विधानसभा क्षेत्रात भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.