PC वार्ता राजकीय विशेष: "अहो अजित दादा... तुमचे 'चमत्कार' आता पाडावे लागतायत!"; आमदार महेश लांडगे यांचा थेट हल्ला, भोसरीच्या पुलावरून काढले वाभाडे!

​पिंपरी-चिंचवड (भोसरी): "पिंपरी-चिंचवडमध्ये २५ वर्षे सत्ता गाजवली, मनाला वाटतील तसे निर्णय घेतले, पण दोन रस्त्यांच्या रुंदीकरणापलीकडे आपण शहराला काहीही दिले नाही. तुमच्या दूरदृष्टीच्या अभावामुळेच आज कोट्यवधींचे पूल पाडण्याची वेळ आली आहे," अशा बोचऱ्या शब्दांत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ​आमदार लांडगे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया चॅनेलवरून एक व्हिडिओ प्रसिद्ध करत अजित पवारांच्या 'पुणे-पिंपरी मॉडेल'वर कडाडून प्रहार केला आहे. ​"भोसरीचा पूल म्हणजे दिशाहीन नियोजनाचा नमुना" ​आमदार लांडगे यांनी अजित पवारांनी दावा केलेल्या भोसरी उड्डाणपुलाचे उदाहरण देत जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, "दादा, या पुलावरून पुणे-नाशिक महामार्गावरील १० टक्के वाहनेही जात नाहीत. आता हा पूल मेट्रोसाठी पाडावा लागणार आहे. हे काही तुमच्यासाठी नवीन नाही. चाकणचा चुकलेला पूल असो, पुणे विद्यापीठ असो किंवा हिंजवडीतील लक्ष्मी चौकातील दिशा चुकलेला पूल; हे सर्व तुमचे 'चमत्कार' आज पाडावे लागत आहेत." Facebook video link ​५० वर्षांचा विचार केला असता, तर ही वेळ आली नसती! ​अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना महेश लांडगे पुढे म्हणाले की, "दादा, जर तुम्ही पुढच्या ५० वर्षांचा विचार करून एकतरी काम केले असते, तर आज शहरवासीयांवर ही वेळ आलीच नसती. पण तुम्ही फक्त आपली स्क्रिप्ट वाचत राहा आणि भाषणं ठोकत राहा. मात्र, पिंपरी-चिंचवडची जनता सूज्ञ आहे, ती हे विसरणार नाही." ​राजकीय वर्तुळात खळबळ; 'क्रेडेबिलिटी'वर प्रश्नचिन्ह? ​निवडणुकीच्या तोंडावर 'पाडापाडी' आणि 'नियोजनाचा अभाव' या मुद्द्यावरून आमदार लांडगे यांनी अजित पवारांना घेरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. "तुमच्या काळात दूरदृष्टी नव्हती, म्हणूनच आज ही परिस्थिती ओढावली आहे," असे म्हणत लांडगे यांनी पवारांच्या विकासकामांच्या दाव्यातील हवाच काढून घेतली आहे