पिंपरी-चिंचवडकरांना अजितदादांचं मोठं गिफ्ट! महापालिकेत सत्ता आल्यास मेट्रो आणि PMPML प्रवास 'मोफत'

Pimpri Chinchwad: "पिंपरी-चिंचवडचा सर्वांगीण विकास म्हणजे के पोकळ घोषणा नव्हे, तर ती प्रत्यक्ष अंमलबजावणीची हमी आहे. कामगार, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठांच्या सन्मानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रगतीचा संकल्प मांडला आहे," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी आपले 'लोकजाहीरनामापत्र' जनतेसमोर ठेवले आहे. शहराला सुरक्षित, समृद्ध आणि स्मार्ट बनवण्यासाठी राष्ट्रवादीने या जाहीरनाम्यातून सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा देणाऱ्या मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. जाहीरनाम्यातील मुख्य 'ब्रह्मास्त्र': 🚀 प्रवास मोफत: कामगार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मेट्रो व पीएमपीएमएल (PMPML) बस प्रवास पूर्णतः मोफत करण्यात येईल. 🏥 आरोग्य सुरक्षा: महापालिकेची रुग्णालये 'हायटेक' केली जातील. महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळतील. 🎓 शिक्षण क्रांती: महापालिकेच्या शाळांचे 'सुसज्ज मॉडेल' शाळांमध्ये रूपांतर करून डिजिटल सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना राबवणार. 🏠 घरकुल व पुनर्वसन: 'सर्वांसाठी हक्काचा निवारा' या अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन आणि घरकुल योजनांना गती देणार. 💰 मध्यमवर्गाला दिलासा: शहराचा विकास करताना मध्यमवर्गासाठी मालमत्ता करमुक्त करण्याचे आणि सामाजिक सुरक्षा देण्याचे महत्त्वाचे आश्वासन. महिला आणि सुरक्षिततेवर विशेष भर महिला सक्षमीकरणासाठी सुरक्षित शहर, सीसीटीव्हीचे जाळे आणि रोजगार प्रशिक्षणाद्वारे महिलांच्या हाताला काम देण्याची ठोस भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. तसेच स्मार्ट ट्रॅफिक आणि ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून शहराला खऱ्या अर्थाने 'स्मार्ट सिटी' बनवण्याचा निर्धार केला आहे. पर्यावरण आणि पायाभूत सुविधा "स्वच्छ, हरित आणि प्रदूषणमुक्त पिंपरी-चिंचवड" हे स्वप्न उराशी बाळगून कचरा व्यवस्थापन, नळाद्वारे मुबलक पाणीपुरवठा आणि मजबूत ड्रेनेज लाईनचे जाळे विस्तारले जाईल.