"पिंपरीला काय हवंय, हे बारामतीकरांना कसं कळणार?"; 'विमानातून फिरणाऱ्यांना' नेत्यांचा घरचा रस्ता दाखवण्याचा निर्धार!
PC वार्ता राजकीय विशेष: "पिंपरीला काय हवंय, हे बारामतीकरांना कसं कळणार?"; 'विमानातून फिरणाऱ्यांना' नेत्यांचा घरचा रस्ता दाखवण्याचा निर्धार!
पिंपरी-चिंचवड: "ज्यांनी २५ वर्षे शहरावर एकहाती सत्ता गाजवली, त्यांना स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न कधीच दिसले नाहीत. रेड झोन आणि डेअरी फार्मचे प्रश्न सोडवता आले नाहीत. आता वेळ आली आहे, शहराचे निर्णय शहरातच घेण्याची!" अशा प्रखर शब्दांत पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात 'स्वाभिमानी' शड्डू ठोकण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक २१ मधील (पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर व जिजामाता रुग्णालय परिसर) भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला.
सत्ताधाऱ्यांच्या 'एकहाती' कारभारावर प्रहार
सभेत बोलताना नेत्यांनी थेट बारामतीचा उल्लेख करत नाराजी व्यक्त केली. "शहरात आतापर्यंत २९ महापौर झाले, पण एकालाही राजकारणात मोठे होण्याची संधी त्यांनी दिली नाही. आम्हाला विमानातून फिरणारा नेता नको, तर आमच्या सुख-दुःखात धावून येणारा, आमच्यातलाच नेता हवा आहे," अशी रोखठोक भूमिका मांडण्यात आली.
देवेंद्र फडणवीस आणि साडेबारा टक्क्यांचा विजय
"जे प्रश्न ३० वर्षांत सुटले नाहीत, ते प्रश्न देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना निकाली लागले. साडेबारा टक्क्यांच्या प्रश्नावर भाजप सरकारने भूमिपुत्रांना न्याय दिला. त्यामुळे आता बाहेरच्या लोकांच्या हातचे बाहुले बनण्यापेक्षा स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकर म्हणून आम्ही ठाम आहोत," असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रभाग २१ चे भाजपचे शिलेदार:
या प्रभागातून भारतीय जनता पार्टीने खालील चौघांना 'कमळ' फुलवण्यासाठी रिंगणात उतरवले आहे:
१. सौ. उषाताई संजोग वाघेरे
२. सौ. मोनिका सुरेश निकाळजे
३. श्री. गणेश ढाकणे
४. श्री. नरेश पंजाबी
पुन्हा एकदा 'भाजप'चा निर्धार
पिंपरी-चिंचवडकरांच्या स्वाभिमानासाठी आणि शहराच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी पुन्हा एकदा भाजपचे सरकार महापालिकेत आणण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी केला.
