पुणे (PC Varta):
आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यासाठी आपले 'व्हिजन डॉक्युमेंट' आणि 'अष्टसूत्री हमीपत्र' प्रसिद्ध करून राजकीय मैदानात मोठी आघाडी घेतली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी 'जबाबदारी स्वीकारणारा पुणेकर' म्हणून आपली नवी भूमिका मांडत विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
पुणेकरांसाठी 'अष्टसूत्री' सुरक्षा कवच
अजित पवारांनी पुण्यातील या जाहीरनाम्यात केवळ आश्वासनं दिली नाहीत, तर 'मोजमापाचा जाहीरनामा' मांडला आहे. "जर कामं झाली नाहीत, तर आम्हाला जाब विचारा," असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे. त्यांच्या अष्टसूत्रीमधील प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
सवलतींचा पाऊस: पुणेकरांसाठी मोफत PMPML बस प्रवास, मोफत मेट्रो प्रवास आणि छोट्या घरांसाठी 'शून्य मालमत्ता कर' (Property Tax) सवलत देण्याचे मोठे आश्वासन त्यांनी दिले आहे.
टँकर माफियांवर प्रहार: पुण्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी टँकर माफियांची सुटी करून प्रत्येक घराला पुरेसा आणि दाबाने पाणीपुरवठा करण्याचे वचन त्यांनी दिले आहे.
शिक्षण क्रांती: १५० 'पुणे मॉडेल स्कूल' उभारून जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी मोफत टॅब्लेट्स दिले जाणार आहेत.
महिला सक्षमीकरण: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली आहे.
पुण्याच्या समस्यांवर ठोस उपाय
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 'मिसिंग लिंक' प्रकल्प पूर्ण करणे, नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर १००% प्रक्रिया करणे आणि वॉर्डनिहाय अद्ययावत दवाखाने उभारणे यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला आहे. "हा जाहीरनामा कौतुकासाठी नाही, तर पुणेकरांच्या मोजमापासाठी आहे," असे म्हणत त्यांनी आपली जबाबदारी अधोरेखित केली.
राजकीय विश्लेषण
अजित पवारांनी या जाहीरनाम्यातून पुण्यातील मध्यमवर्गीय, कष्टकरी आणि विद्यार्थी अशा सर्वच थरांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः मोफत प्रवास आणि शून्य टॅक्स यांसारख्या घोषणांमुळे विरोधकांना आता केवळ टीकेने नाही, तर ठोस पर्यायाने उत्तर द्यावे लागणार आहे.

