पुणे पोलिसांची मोठी कारवाई; रेकॉर्डवरील 'तडीपार' गुन्हेगार पिस्तुलसह जेरबंद!


पुणे | विशेष प्रतिनिधी
पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने धडाकेबाज कारवाई करत रेकॉर्डवरील एका सराईत तडीपार गुन्हेगाराला शिताफीने अटक केली आहे. २९ डिसेंबर २०२५ रोजी सिंहगड रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
गोपनीय बातमीदाराच्या माहितीने लागला छडा
गुन्हे शाखा युनिट-३ चे पथक सिंहगड रोड, नांदेड सिटी, वारजे आणि उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार कैलास लिमण यांना एका गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश सतीश रणखांब (वय ३५, रा. कोथरूड) हा बेकायदेशीर हत्यारासह सिंहगड सृष्टी जवळील एका टपरीपाशी येणार असल्याची ती बातमी होती.
अशी झाली कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सिंहगड सृष्टी जवळ, टी पॉईंट चौक, एनडीए खडकवासला कडे जाणाऱ्या रोडवर सापळा रचला. संशयित गणेश रणखांब तेथे येताच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे अवैधरीत्या बाळगलेले ०१ पिस्तुल आणि ०२ जिवंत काडतुसे मिळून आली. तो तडीपार असतानाही शहरात विनापरवाना फिरत असल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याला उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांच्या मार्गदर्शनाखाली झाली यशस्वी कामगिरी
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त निखिल पिंगळे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत युनिट-३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक राम राजमाने, सपोनि ज्ञानेश्वर ढवळे, उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे आणि कर्मचारी किशोर शिंदे, मारुती पारधी, अमोल काटकर, कैलास लिमण, मोहंमद शेख, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला यांचा सहभाग होता.

पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत राहा – 'द रणनीती' (The Ranneeti).